कोरेगाव – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे टोक असलेल्या जायगाव परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. हे लक्षात येताच आमदार बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजनेतून जायगाव-कण्हेरखेड रस्त्यासाठी 40 लाख रुपये निधीची तरतूद करून घेतली आहे. जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर झाला असून, रस्त्याच्या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे, अशी माहिती कार्यकर्ते प्रशांत संकपाळ व महेश कदम यांनी दिली.
दरम्यान, या रस्त्यासाठी निधी दिल्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांचा नुकताच सत्कार केला.
जायगाव येथे जाण्यासाठी एकंबे आणि कण्हेरखेड येथून रस्ते आहेत. दोन्ही रस्ते अत्यंत खराब झाले असून, पावसाळ्यात जायगाव-कण्हेरखेड रस्त्यावरील पुलाला भगदाड पडले होते. हा रस्ता अत्यंत धोकादायक झाल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. जायगाव आणि कण्हेरखेड ग्रामस्थांनी ही बाब आमदार बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
त्यावर, आमदार पाटील यांनी या रस्त्यासाठी तातडीने निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजनेतून जायगाव-कण्हेरखेड रस्त्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यतादेखील दिली असून, रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. एकंबे-जायगाव रस्त्यासाठीही आमदार पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रशांत संकपाळ व महेश कदम यांनी सांगितले.
दरम्यान, जायगाव-कण्हेरखेड रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते विष्णू संकपाळ, रवींद्र संकपाळ, शंकर शिंदे, नितीन संकपाळ, धोंडिराम संकपाळ, धनाजी कुंभार, सुरेश संकपाळ, हणमंत चव्हाण, नीलेश गायकवाड, शंकर संकपाळ, नवनाथ संकपाळ, अमोल कदम, तानाजी संकपाळ, नाना शिंदे यांनी कराड येथील जनसंपर्क कार्यालयात आमदार पाटील यांचा सत्कार केला.