रेठरे बुद्रुक – सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीसाठी शिक्षक समिती पूर्ण ताकतीनिशी निवडणूक रिंगणात उतरली असून शिक्षक बॅंकेत सत्ता परिवर्तन अटळ आहे. शिक्षक बॅंकेतील भ्रष्टसत्ता उलथून टाकण्यासाठी शिक्षक समितीला दिवसेंदिवस सर्वसामान्य सभासदांचा वाढता पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी केले.
कराड येथील शिक्षक सोसायटीच्या सभागृहात कराड-पाटण तालुका शिक्षक समितीची शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने उमेदवार चाचपणी करण्यासाठी आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, जिल्हा सरचिटणीस तथा संचालक शिक्षक बॅंक किरण यादव, जिल्हा कोशाध्यक्ष मोहनराव सातपुते, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय नांगरे, प्रसिध्दी प्रमुख चंद्रकांत कांबळे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील, विनायक चव्हाण, शिक्षक बॅंकेचे संचालक सुभाष शेवाळे, शिक्षक सोसायटीचे माजी चेअरमन अंकुश नांगरे सरचिटणीस नारायण सातपुते, ज्येष्ठ मार्गदर्शक रशीद ,हणमंतराव पाटील, शिवाजी भुसारी, दिलीप गुरव संपतराव साकुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदय शिंदे म्हणाले, शिक्षक समिती लोकशाही मार्गाने चालणारी एकमेव शिक्षक संघटना आहे. तेव्हा निवडणुकीसाठी सर्व तळागाळातील सभासदाला विचारात घेऊन सर्व उमेदवारांची नावे निश्चित करणार असल्याचे राज्याध्यक्ष यांनी जाहीर केले. मागील काळात झालेल्या चुका सुधारून पुढे कसे जावे लागेल; याविषयात त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षक समितीकडे बॅंकेची सत्ता असताना सभासद हिताशिवाय अन्य कोणतेही भ्रष्ट काम समितीने केले नाही. बॅंकेतील भ्रष्ट प्रवृत्ती कायमची घरी घालविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक सभासदांचा वाढता पाठिंबा समितीला मिळत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक समितीची बॅंकेवर सत्ता आणायची असेल; तर कार्यकर्त्यांनी प्रत्येकाने स्वतःच उमेदवार असल्याप्रमाणे सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन केले. तर जिल्हा सरचिटणीस किरण यादव यांनी उमेदवारी अर्ज कसा भरावा याविषयी माहिती दिली. तसेच बॅंकेच्या भ्रष्ट कारभारातील अनेल मुद्दे सांगून जागृती करण्याचे काम केले.
यावेळी कराड-पाटण मतदार संघातील इच्छुक उमेदवार यांची नावे घेण्यात आली. तसेच राखीव मतदार संघातील इच्छुक उमेदवार यांची ही नावे घेण्यात आली. संचालक सुभाष शेवाळे यांनीही मनोगत व्यक्त करताना बॅंकेच्या वेगवेगळ्या फसलेल्या योजना सांगितल्या.
प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अरुण पाटीलयांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष लालासाहेब देसाई, आनंदराव थोरात, खटाव तालुका शिक्षक समितीचे उपाध्यक्ष शिवनाथ लखापते आनंदराव पाटील, शशिकांत तोडकर, यशवंत जाधव, संजय बांदेकर, दिनकर पाटील, गणेश खुरंगे, पांडुरंग माने, दत्तात्रय जाधव, आशुतोष गरुड,सचिन भिवरकर,रामकृष्ण थोरात,प्रवीण कारंडे,रहिमान नायकवडी,गोरख गिरी गोसावी, हणमंत पाटील, सर्जेराव साठे, सतीश गवळी, दिलीप गुरव, संदीप कोरडे यासह कराड-पाटण तालुक्यातील अनेक शिक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार नारायण सातपुते यांनी मानले.