मुंबई- तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यास अजून सुरुवात केली नसतानाही ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या विविध उत्पादनांच्या किमती वाढविण्यास सुरुवात केली आहे.
किरकोळ आणि घाऊक किमती वरील महागाई उच्च पातळीवर गेल्याची आकडेवारी कालच जाहीर झाली आहे. आगामी काळात तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केल्यानंतर ही महागाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर या भारतातील प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तू निर्माण करणाऱ्या कंपनीने आपल्या चहा, कॉफी, नूडल्सच्या उत्पादनात वाढ जाहीर केली आहे. नेस्ले या कंपनीने ही आपल्या विविध उत्पादनांच्या दरात वाढ जाहीर केली.
युनिलिव्हरने आपल्या ब्रू कॉफी च्या दरात तीन ते सात टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना हॉटेलमध्येही लवकराच दरवाढ स्वीकारावी लागणार आहे. युनिलिव्हर कंपनीने म्हटले आहे की एकूणच महागाई वाढल्यामुळे आमच्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये भयंकर वाढ झाली आहे.
त्याचबरोबर आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत आहे. नेस्ले कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही मॅगीच्या किमती 16 टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर या कंपनीने आपल्या दुधाच्या आणि कॉफी पावडरच्या दरातही वाढ जाहीर केली आहे. या अगोदरच प्रवासी वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी विविध कारणांमुळे आपल्या विविध उत्पादनांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ जाहीर केली आहे. इतर क्षेत्रातूनही या पंधरवड्यात दरवाढ जाहीर केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.