राजगुरूनगर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यातील एका गावातील मजूर कामगाराच्या 10 वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम.अंबाळकर यांनी 20 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली शंकर गुंजाळ (वय 28 रा. नागापूर, ता. आंबेगाव) असे शिक्षा झालेल्या नराधमाच्या नाव आहे. आंबेगाव तालुक्यातील एका गावात दि.15 जून 2016 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. तर पीडितच्या आईने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलोई होती. तत्कालीन तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक एस ए तोरडमल यांनी दि.16 जून 2016 रोजी आरोपी गुंजाळ यास अटक केली होती.
हा खटला न्यायाधीश ए. एम.अंबाळकर यांच्या न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील रजनी नाईक-देशपांडे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने या खटल्यात 7 साक्षीदार तपासले, पीडित मुलगी, तिची आई,पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी एस. ए. तोरडमल यांची साक्ष नोंदवण्यात आली. पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकील रजनी नाईक-देशपांडे यांचा प्रभावी युक्तिवाद ऐकून न्यायाधीश अंबाळकर यांनी आरोपी गुंजाळला दोषी ठरवले.
“अशा प्रकारची दुष्कृत्ये करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. जेणेकरून लहान मुलीं व महिलांवर होणारे अत्याचार थांबतील. न्यायालयात महिलांवर अन्याय-अत्याचाराचे असंख्य खटले प्रलंबित आहेत. काही घटनेत पीडित महिला व साक्षीदार यांना पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे.
– रजनी नाईक-देशपांडे, सरकारी वकील
त्यास 10 वर्षे सश्रम कारावास व 2000 रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास, बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये 20 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार दंड, दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठवाली. यात पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून 10 हजार रुपये देण्याचा आदेश दिला. न्यायालयीन पोलीस कामकाज पोलीस हवालदार आर. एस. जाधव यांनी कामकाज केले.