बारामतीच्या नगराध्यक्षा तावरे यांचे मत : पांडकर असोसिएट्सच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन
बारामती – संघर्षातून यशस्वी वाटचाल करत कर सल्लागार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून अडीच हजार ग्राहकांशी संलग्न राहणारे सतीश पांडकर हे इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी व्यक्त केले.
बारामती येथील कर सल्लागार सतीश पांडकर असोसिएट्सच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, तसेच सनदी लेखापाल एम. डी. बलदोटा यांच्या हस्ते पार पडले, यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पुणे शहर सहकारी संस्था निबंधक शाहूराज हिरे, सहायक निबंधक एस. एस. कुंभार, सांगली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अभिमन्यू वरुडे, बांधकाम व्यवसायिक मेहुल गुजर, प्रा. रामदास धापटे, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे, निवृत्त शासकीय अधिकारी प्रकाश अवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्षा तावरे म्हणाल्या की, जिद्द, सचोटी, कामाप्रती असलेली आस्था, तसेच संघटनात्मक कामकाज व विश्वासार्हतेच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पांडकर यांनी कर सल्लागार म्हणून लौकिक मिळविला आहे. 30 वर्षांच्या कार्यकाळात ते अनेक आव्हानांना धैर्याने सामोरे गेले आहेत, त्यामुळेच सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा कार्यालयाची ते निर्मिती करू शकले. संघर्षमय प्रवासातून कर सल्लागार म्हणून त्यांनी मिळविलेले यश इतरांसाठी देखील प्रेरणादायी आहे.
कोणत्याही क्षेत्रांत काम करण्यासाठी गुरुकिल्ली महत्त्वाची असते. माझ्या आयुष्यात देखील सनदी लेखापाल एम. डी. बलदोटा यांच्यासारखे गुरू लाभले. त्यांनी दिलेल्या शिकवणीतून आत्तापर्यंतचा प्रवास झाला. कर सल्लागार म्हणून काम करत असताना आज अडीच हजारांहून अधिक ग्राहकांशी जोडलो गेलो आहे. ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला इथून पुढील काळात देखील न्याय देण्याचा प्रयत्न आहे.
– सतीश पांडकर, कर सल्लागार, बारामती
मेहनतीच्या जोरावर सतीश पांडकर यांनी यश संपादन केले मात्र ते करत असताना 35 वर्षांचे असलेले गुरू-शिष्याचे नाते देखील त्यांनी जपले. याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे.
– एम. डी. बलदोटा, सनदी लेखापाल