शहरात कचरा सकलन पोहचले 200 टनावर

रवींद्र कदम
महापालिकेच्या तिजोरीवर पडतो भार : स्वयंभूकडून आकडा वाढतो की खरचं कचरा वाढला

नगर – स्वच्छ भारत अभियानात महापालिकेची कामगिरी चांगली होण्यासाठी कचरा संकलन मोहिम हाती घेण्यात आली. त्यासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्‍ती केली. पण आज महापालिकेमार्फत होणाऱ्या कचरा संकलनापेक्षा जास्त कचरा या ठेकेदाराकडून होत आहे. त्यामुळे महापालिकेचा खर्च वाढला असून तिजोरीवर कोट्यवधीचा भार सध्या पडत असल्याचे चित्र आहे. महापालिकेमार्फत यापूर्वी 120 टन कचरा संकलन होत होते. ते आता पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्टमार्फत तब्बल 200 टन कचरा संकलन होत आहे. त्यामुळे शहरात कचरा वाढला की स्वयंभूचा आकडा याबाबत महापालिकेत जोरदार चर्चा आहे.

शहरात गेल्या महिन्यात स्वच्छता अभियानांतर्गत महापालिकेने स्वच्छता मोहिम राबविण्यात आले. महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी या अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शहर स्वच्छेच्या मागे लागले. मात्र, अभियान संपल्यानंतर महापालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहे. तसेच महापालिकेने स्वयंभू ट्रान्सपोर्टला ठेका दिला असल्याने स्वयंभू दररोज 200 टन कचरा संकलन करत असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे या ठेकेदारास कोट्यवधी रुपये मोजावे लागणार आहे. शहरातील बऱ्याच भागात कचरा संकलनासाठी घंटा गाड्या येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे शहर पुन्हा अस्वच्छतेकडे जाते की काय अशी भीती नगरसेवकांकडून व्यक्‍त होत आहे. कचऱ्या संदर्भात त्यांनी उपायुक्तांची भेट घेऊन चर्चा केली होती.

महापालिकेमार्फत शहरात कचरा संकलन होत असतांना शहरातून 120 ते 130 टन कचरा संकलन होते. आता मात्र स्वयंभूकडून तब्बल 200 टन कचरा संकलन होत आहे. स्वयंभूला टनामागे 1 हजार 650 रुपये दिले जातात. त्यामुळे शहरातील अनेक ठिकाणचा साचलेला कचरा उचलण्यात आला असून घरो-घरी कचरा संकलन केला जात आहे. त्यामुळे दररोज 70 टन कचरा जास्तीचा संकलन होत आहे. आता हा कचरा खऱ्या अर्थाने वाढला की ठेकेदाराने तो वाढविला हे कोण पाहणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महापालिकेने स्वयंभूबरोबर तीन वर्षाचा करार केला असून स्वयंभूने ही शहरात कचरा संकलन करण्यासाठी 50 घंटागाड्या, 10 कंटेनर, 6 कॉम्पॅक्‍टरद्वारे कचरा उचलला जात आहे. बुरुडगाव येथील कचरा डेपो बंद असल्याने सावेडी येथील कचरा डेपोत कचरा टाकण्यात येत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील लोकसंख्याप्रमाणे कचऱ्याचे गणित काढले जाते. त्यानुसार प्रति व्यक्ती 300 ग्रॅम असे चार लाख लोकसंख्येनुसार दररोज शहरात 120 ते 140 टन कचरा शहरात साचला जातो. त्याची कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वयंभू ट्रान्सपोर्ट कडून 65 वाहनाद्वारे कचरा संकलन करण्यात येते.

70 टन कचरा वाढल्याने महिन्याला 2 हजार 100 टन कचरा वाढणार असून, त्यासाठी 34 लाख 65 हजार रुपये महापालिकेला मोजावे लागणार आहे. तोच खर्च वर्षासाठी 4 कोटीच्यावर जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत अधिकच भार पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.