मुंबई – सध्या जगभरामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र असून विविध नामांकित ऑटोमोबाईल कंपन्या आपली इलेक्ट्रिक व्हेईकल्स लाँच करत असल्याने इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमधील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता या स्पर्धेमध्ये ‘टाटा’ने देखील उडी घेतली असून टाटा तर्फे आपली प्रसिद्ध एसयूव्ही TATA NEXON चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करण्यात येणार आहे. टाटाच्या या नव्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ३०.२ kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली असून ही कार संपूर्ण चार्ज केल्यानंतर ३०० किलोमीटरचे अंतर पार करू शकेल असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक कार या लवकर ‘स्पीड’ पकडण्यामध्ये अयशस्वी होत असल्याने अनेकदा ग्राहक अशा गाड्यांकडे पाठ करतात मात्र टाटाच्या या नव्या एसयूव्हीमध्ये झीप्ट्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याने ही कार २४५ न्यूटन मीटरचा टॉर्क निर्माण करून केवळ ९.९ सेकंदांमध्ये ० ते १०० एवढा वेग पकडू शकेल असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे, टाटा समूहातर्फे TATA NEXON EV या एसयूव्ही कारची किंमत १५ ते १७ लाखांदरम्यान ठेवण्यात येईल असा अंदाज आहे.