तळेगाव दाभाडे – शहरातील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालक स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित दिंडी सोहळ्यामध्ये टाळ मृदुंग घेत विठ्ठल नामाचा गजर करत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली.
‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ जयघोष करत, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती भगवी पताका, टाळ-मृदुंगाच्याच्या गजरात विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करत दिंडी सोहळ्याने संपूर्ण वातावरण भक्तीमय करून सोडले. यावेळी महाराष्ट्र संतांची भूमी हा फिरता देखावा सर्वांचे लक्ष वेधत होता.
दरम्यान रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष राहुल खळदे व स्वाती खळदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पालखी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. शुभांगी कदम यांनी दिंडी सोहळ्याची माहिती देत त्याचे महत्त्व विषद केले. बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा, फुगड्या, गवळण व अभंग सादरीकरण यामुळे संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाहून निघाला होता.
यावेळी सुनील खोल्लम, दादासाहेब उ-र्हे, मिलिंद शेलार, रजनीगंधा खांडगे, सुदाम दाभाडे, मुख्याध्यापिका शमशाद शेख, रेणू शर्मा, सुजाता गुंजाळ, तेजस्विनी सरोदे, धनश्री पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा अहिरे यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.