- तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक घटना
तळेगाव दाभाडे – किरकोळ कारणावरून एका 55 वर्षीय व्यक्तीचा नात्यातीलच तरुणाने दारूच्या नशेत जिवंत जाळले. तळेगाव दाभाडे येथील जाधव चाळीत मंगळवारी (दि. 20) पहाटे ही धक्कादायक घटना घडली.
विजयसिंग भगवानसिंग जव्हेरी (वय 55) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मीना विजयसिंग जव्हेरी (वय 47, दोघेही रा. जाधव चाळ, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत नारायणसिंग विजयसिंग जव्हेरी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस वर्षांपूर्वी मयत वियजसिंग जव्हेरी यांचे “ब्रेन ट्युमर’चे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर ते कोणतेही काम करीत नव्हते, तसेच गेल्या पाच-सहा महिन्यांपासून ते अंथुरणावर खिळलेले होते. फिर्यादी मीना यांचा धाकटा भाऊ पंढरपूर येथे राहत होता. मात्र, त्याच्या भावाचा मुलगा आरोपी नारायणसिंग हा दारू पिऊन वारंवार त्रास देत. या सततच्या त्रासाला कंटाळून मीना यांचा भाऊ कुटुंबियांसह 15 दिवसांपासून तळेगावात मीना यांच्या घरी वास्तव्यासाठी आले.
तळेगावात आल्यानंतरही नारायणसिंग यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही. दारू पिऊन शिवीगाळ, वाद सुरूच होते. सोमवारी (दि. 19) दिवसभर नारायणसिंग याने दारू पिऊन त्याच्या कुटुंबियांसोबत भांडण होता. मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास नारायणसिंग हा मीना यांच्या घरात जबरदस्तीने घुसला.
त्यामुळे मीना घाबरून घराबाहेर पाळल्या आणि घर मालकीणीकडे गेल्या. मात्र कोणीही समजून घेण्याच्या मन:स्थितीत तो नव्हता. त्यामुळे मीना यांना नारायणसिंग याला घरात डांबले. मात्र त्यावेळी त्याने घरात अंथरूणावर खिळलेले विजयसिंग यांना दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून विजयसिंग यांना पेटवून देऊन त्यांचा खून केला, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कुंदा गावडे तपास करीत आहेत.