अकोला – पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना अनेकदा लोक घाईत असतात. तर पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील वेगाने काम करण्याचं आव्हान असतं. अशावेळी अनेकदा लोक आपलं एटीएम कार्ड किंवा पैसे द्यायचे विसरून जातात. तर कर्मचाऱ्यांकडून देखील चुका होतात. या गोष्टी अनावधानाने होतात. मात्र अकोला येथे एका तलाठी महिलेने पेट्रोलपंपावरील मोबाईलच पळवला.
दुचाकीत पेट्रोल भरत असताना आरोपी तलाठी महिलेने पंपावरील मोबाइल लंपास केला. गाडीत पेट्रोल भरल्यानंतर तलाठी महिलेने पंपावरील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून मोबाइल चोरला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.
मोबाइल चोरीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. त्यानंतर आरोपी महिला तलाठी असल्याचं उघड झालं. गायत्री सुनील कोरडे असं आरोपी महिलेचं नाव असून ती अकोला जिल्ह्यातील मलकापूर येथील रहिवासी आहेत.
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केल्यानंतर चोरीचा मोबाईल हस्तगत केला. महिलेला न्यायालयात हजर केलं असतं न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. संबंधित आरोपी म्हैसांग याठिकाणी कार्यरत आहे.