नाट्यगृहे सुरू होताना कर्मचाऱ्यांची वानवा
पुणे – तब्बल आठ महिन्यानंतर महापालिकेकडून शहरातील नाट्यगृहे सुरू करण्याचे आदेश काढले असले तरी, नाट्यगृहांसाठी घालून देण्यात आलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी नाट्यगृहांमध्ये कर्मचारीच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नाट्यगृहांचे जे कर्मचारी कोवीड कामासाठी नेमण्यात आले होते. त्यांना अद्याप त्या कामातून मुक्त करण्यात आले नसल्याने पालिकेच्या सांस्कृतीक विभागाकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे कर्मचारी तसेच सुरक्षा साधणांची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, नाट्यगृह सुरू करण्याचे आदेश काढल्यानंतर अवघ्या चार दिवासातच; दिवाळीसाठीचे आदेश काढताना आयुक्तांनी सांस्कृतीक कार्यक्रम, सामुदायिक कार्यक्रम तसेच सोहळ्यांना मनाई केल्याने, नाट्यगृहांना पुढील आदेश येईपर्यंत टाळे लागले आहे.
राज्यशासनाने तब्बल आठ महिन्यानंतर नाट्यगृहे सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्स, प्रत्येकाची थर्मल तपासणी, ऑक्सिजन लेव्हल, हॅन्ड सॅनिटाझर वापरणे बंधनकारक केले आहे. शहरात महापालिकेची सुमारे 14 नाट्यगृहे आहेत. त्या ठिकाणी असलेले जवळपास बहुतांश कर्मचारी महापालिकेने करोना नियंत्रणाच्या कामासाठी पाठविण्यात आले आहे. तर नाट्यगृहे सुरू करण्यात आल्यानंतरही या कर्मचाऱ्यांच्या करोना नियुक्ता रद्द करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नाट्यगृहांमध्ये आवश्यक असलेले कर्मचारीच नसल्याचे समोर आले आहे.
क्षेत्रीय कार्यालयांना साकडे…
महापालिकेच्या नाट्यगृह व्यवस्थापकांकडून सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच, नाट्यगृहांसाठी थर्मलगन, सॅनिटायझर, ऑक्सिजन मीटर, औषध फवारणी यंत्रांची मागणी करण्यात आली आहे. तसेच नाट्यगृहांकडे या कामासाठी कर्मचाऱ्यांचीही मागणी करण्यात आली आहे.