नांदेड – देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राजकीय पक्षांच्या प्रचारसभा सुरु आहेत. मतदारांचे मत आपल्याच पारड्यात पाडण्यासाठी नेते कामाला लागले आहेत. अशातच एका सभेत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘पैसा कोणाचाही घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा’, असे विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले मिटकरी?
पंढरपूरमध्ये जी चूक मतदार राजाकडून घडली तशी चूक घडू देऊ नका. तुमचं मत मीठ मिरची एवढे स्वस्त समजून या दलालांपुढे गहाण ठेवू नका. त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत. त्यांचे एक एक कार्यालय 30 हजार कोटींचे आहे. आता दिवाळी आहे. आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका. फटाके, फराळ घ्या. भाजपाचा पैसा घ्यायचा पण काँग्रेसला मतदान करायचे, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे.
नांदेडमधील देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 2 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असेल. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी मतदान जाहीर झाल्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.