महापालिका आयुक्तांचे आदेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात हजर होत नाहीत. हजेरी लावून वैयक्तिक आणि खासगी कामासाठी निघून जातात. वारंवार उशिरा येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत. कारवाई न केल्यास विभागप्रमुखांवरच कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे.
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक थम्ब इंप्रेशनद्वारे हजेरी बंधनकारक आहे. मात्र, काही अधिकारी व कर्मचारी वारंवार उशिरा येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, काही अधिकारी व कर्मचारी थम्ब करून आपल्या खासगी कामासाठी निघून जातात. तसेच, काही जण कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. त्यामुळे महापालिकेच्या नियमित कामकाजावर परिणाम होऊन ते प्रलंबित राहते. या तक्रारींची दखल घेऊन आयुक्त हर्डीकर यांनी सर्व विभागप्रमुखांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची असल्याचे परिपत्रक काढले आहे.
महापालिका शिस्त व नियमाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या संदर्भातील अहवाल विभागप्रमुख दरमहा सादर करीत नसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. तीन वेळा लेटची नोंद झाल्यास रजा कपातीची कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, विभागप्रमुख त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी, सेवानिवृत्तीनंतर तांत्रिक प्रश्न निर्माण होत आहेत.