महापालिका : 20 फेब्रुवारीला होणार स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांच्यासह भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीचे दोन असे एकूण आठ सदस्य स्थायीतून बाहेर पडणार आहेत. त्यांच्याजागी नवीन सदस्यांची निवड फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आतापासून स्थायीच्या सदस्यपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून संधी कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यासोबतच दोन वर्षे सदस्य राहिलेल्या आठ सदस्यांना स्थायी समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. त्यामध्ये स्थायीचे सभापती विलास मडिगेरी, सदस्य राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, ममता गायकवाड, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे या भाजपाच्या तर गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा समावेश आहे. या सदस्यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ 19 फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांना संधी मिळणार आहे.
स्थायीत वर्णी लागावी यासाठी दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाची वर्णी लावणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजीच्या महासभेत या सदस्यांची निवड केली जाणार आहे.
तर, मार्चच्या पहिल्या आठवड्यात नव्याने स्थापन होणाऱ्या स्थायी समितीच्या पहिल्या सभेत सभापतीची निवड होणार आहे. सभापती पदासाठी यावेळी भोसरी विधानसभेतून एकाची वर्णी लागणार हे निश्चित आहे. मात्र “तो’ भाग्यवान सदस्य कोण असणार याची चर्चा आतापासून रंगू लागली आहे.
अध्यक्षपद भोसरीकडे
महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यापूर्वी तीन वेळा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थकांना देण्यात आले आहे. तर महापौरपद आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकांना देण्यात आले होते. यावेळी महापौरपद चिंचवडकडे चालून गेल्यामुळे स्थायीचे अध्यक्षपद आमदार महेश लांडगे यांच्या समर्थकाला मिळणार हे निश्चित आहे. सध्या तीन नगरसेवकांची नावे आघाडीवर असून महेश लांडगे यापैकी कोणाला संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.