तुम्ही माझी वेळ घेतली होती का? सुनावल्याने… अंगणवाडी सेविका आल्या पावली परतल्या
पुणे – दिवसभराच्या व्यस्त नियोजनातही तालुक्यातून समस्या घेऊन आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या अडचणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकूण घेतल्या. एवढंच नव्हे तर त्यांच्या पगाराची प्रमुख अडचण सोडवण्याचा प्रयत्न राज्य स्तरापर्यंत केला. मात्र, ज्या विभागाचे हे कर्मचारी आहेत, त्याच विभागाच्या प्रमुखांनी सेविका आणि मदतनीसांना भेट नाकारत “तुम्ही माझी वेळ घेतली का?’ असे महिला कर्मचाऱ्यांना सुनावले. त्यामुळे या दोन अधिकाऱ्यांमधील वागणुकीचे दर्शन या निमित्ताने जिल्हा परिषदेला घडले.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी घोडेगाव पंचायत समिती येथे उपोषणाला बसले होते. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना गटनेते देविदास दरेकर आणि गटविकास अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्यास सांगितले. त्यावेळी दरेकर यांनी “उपोषण करून काही होणार नाही, आपण प्रत्यक्ष सीईओ यांना जाऊन भेटू’ असे सांगितले. त्यानुसार बीडीओ यांनी कर्मचाऱ्याला जिल्हा परिषद कार्यालयात पाठविले. त्यावेळी आज, गटनेते यांनी उपोषणकर्त्यांची आलेल्या समितीची भेट सीईओ आयुष प्रसाद यांच्याशी करून दिली.
सकाळपासून सीईओ सर्व विभागांची टप्याटप्यात आढावा बैठक घेत होते. त्यामुळे व्यस्थ नियोजनात असतानाही तालुक्यातून काही कर्मचाऱ्यांना अडचणी आहेत, त्यांना तुमच्याशी बोलायचे असून ते कार्यालयाबाहेर आले आहेत, असे सीईओ यांना निरोप देताच त्यांनी तात्काळ त्या समितीशी चर्चा करून त्यांच्या अडचणी सोडण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.
तसेच तुम्ही महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांची भेट घ्या आणि त्यांना पत्र द्या, असे सीईओ यांनी सांगितले. त्यावेळी खुद्द गटनेते आणि समितीचे सदस्य मुंढे यांच्याकडे गेले असता, “तुम्ही माझी वेळ घेतली का? असे म्हणून कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा वापरली.’ सीईओ यांनी दिलेल्या सूचनेला ठेंगा दाखवून उलट कर्मचाऱ्यांचा अपमान केला अशी माहिती गटनेते देविदास दरेकर यांनी दिली. एका अधिकाऱ्याने अशाप्रकारे बोलणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.