ध्वनीप्रदूषण करण्याऱ्यांवर कार्यवाही करा – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, : परिसरातील ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज असून ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आमदार मंगेश कुडाळकर यांनी नेहरु नगर, कुर्ला (पूर्व) येथे भोंग्यांच्या आवाजाने होत असलेल्या ध्वनी प्रदुषणाबाबत निवेदन सादर केले. यावेळी पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके, उपसचिव शु. द. आहेर व अधिकारी उपस्थित होते.
करोना प्रादुर्भावाच्या समस्येमुळे ऑफिसची कामे, मुलांच्या ऑनलाईन शाळा, कॉलेज तसेच इतर कामे घरातून केली जातात. परिसरात भोंग्यांच्या आवाजाची तीव्रता अधिक असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होत आहेत. या समस्यांबाबत स्थानिक पोलीसांकडे बैठका घेण्यात आल्या, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, सर्व समाजातील सण-उत्सव सतत सुरु असतात. भोंग्यांना दिलेल्या परवानगीबाबत शहानिशा करून शहरात ध्वनी प्रदूषण होणार नाही यादृष्टीने कार्यवाही करावी. तसेच शांतता समिती बैठकीत सर्व समाजातील लोकांना विश्वासात घेऊन भोंग्यांचा आवाज नियमानुसार असावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ व पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

ध्वनी प्रदुषणासंदर्भात 10 मिनिटांचे सादरीकरण तयार करुन सर्व जनतेमध्ये जागृती करावी. न्यायालयाच्या निर्णयांचा अभ्यास करुन पोलीसांनी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.