केंद्र सरकार सर्वसामान्यांचे नसून कॉर्पोरेटस्‌चे : शेतकरी नेते गुरनामसिंग

शेतकरी नेते गुरनामसिंग चंढूनी यांचा हल्लाबोल
शेतकरी संघटनेचा “रेल्वे रोको’ शांततेत
नवी दिल्ली, दि. 18 (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी शेतकरी आग्रही आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्ही लढा देत असून नवीन कृषी कायदे परत जात नाही तोपर्यंत ते त्यांच्या घरी परतणार नाहीत. तसेच केंद्र सरकार सर्वसामान्यांचे नसून कॉर्पोरेट्‌सचे आहे, असा हल्लाबोल भारतीय किसान युनियनचे (हरियाणा) अध्यक्ष गुरनामसिंग चंढूनी यांनी मोदी सरकारवर केला.
कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 85 वा दिवस आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी आज “रेल्वे रोको’ आंदोलन केले. शेतकऱ्यांचे हे आंदोलन शांततेत पार पडले.
शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता दिल्लीतील मेट्रो रेल्वेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. टीकरी बॉर्डर मेट्रो स्टेशन, पंडित श्रीराम शर्मा, बहादुरगढ सिटी आणि ब्रिगेडियर होशियार सिंह मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले होते.
भारतीय शेतकरी युनियनचे राकेश टिकैत म्हणाले की, ट्रेन थांबवत असताना मुलांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच हे आमचे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. यासोबतच आपले मत जनतेपर्यंतही पोहोचवायचे आहे. कुणाला त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. यामुळे रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या मुलांना दूध-पाण्याची व्यवस्था करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनास राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शविला आहे. पाटणामध्ये जन अधिकार पार्टीच्या (लोकतांत्रिक) कार्यकर्त्यांनी ठरलेल्या वेळेच्या अर्धा तास पहिलेच रेल्वे रोखण्यास सुरुवात केली. यावेळी काही कार्यकर्ते रेल्वे रुळावर झोपल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. तसे राजस्थान, रायपूर आणि आजुबाजूच्या परिसरांमध्येही रेल्वे रोखण्यात आल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.