खालापूर (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याचे काम अखेर मार्गी लागले आहे. ४ कोटी ८० लाख रुपये खर्चाच्या या रस्त्याचे २७० मिटरचे काम वनविभागाच्या परवानगीमुळे रखडले होते. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासनाने सर्व परवानग्या आणल्यानंतर युद्धपातळीवर या रस्त्याचे काम सुरू आहे. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी अधिकाऱयांसह रस्त्याची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील ताकई रस्त्याच्या कामासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ४ कोटी ८० लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला होता. ताकईपासून आडोशीपर्यंत मोठ्या प्रमाणात कारखाने असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची सतत वर्दळ असते.
निधी मंजूर झाल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन २ वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले होते. वनविभागाची अडचण, स्थानिक शेतकर्यांचा प्रश्न, रस्त्याच्या मधे येणारे विजेचे खांब, पालिकेच्या जलवाहिन्या आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाहतूक यामुळे या रस्त्याचे काम रखडले होते.
मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी पालिकेचा पदभार स्वीकारल्यानंतर या रस्त्याच्या कामाला प्राधान्य दिले होते. रस्त्यात अडथळा ठरणारे विजेचे खांब बाजूला काढून बोंझर सोसायटीसमोर मोरीचे काम करून २१० मीटर डांबरीकरण आणि रखडलेला ६० मीटर सिमेंटचा रस्ता पूर्ण करण्याचे काम सध्या सुरू आहे.
रस्त्याचे काम करताना दर्जा राखला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आहे. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या वेळी त्यांच्या समवेत नगर अभियंता अनिल वाणी, कनिष्ठ अभियंता सतीश हडप, ठेकेदाराचे सुपरवायझर गणेश रोकडे आदी उपस्थित होते.