दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) लवकरच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेचे लढतीच्या स्थळांसह वेळापत्रक जाहीर करणार आहे. या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक 21 जानेवारीला जाहीर करणार असल्याची माहिती आयसीसीने दिली. या स्पर्धेची तिकीट विक्री 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022चे सामने 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर2022 या कालावधीत ऑस्ट्रेलियात खेळवले जातील. ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये एकूण 45 सामने खेळविण्यात येणार आहेत. ऍडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे हे सामने होणार आहेत.
अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्नमध्ये खेळला जाईल. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि ऍडलेड येथे खेळवले जातील. दरम्यान, गतवर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे आयोजन भारताने केले होते. पण करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अन्य सामने यूएईमध्ये आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-20 विश्वविजेतेपद पटकावले. त्यामुळे आता कांगारू संघासमोर घरच्या मैदानावर जेतेपद राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.