कोलकाता – कोलकाता : भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा युगाला दमदार सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारताने मालिक 3-0 अशा फरकाने खिशात घातली.
कर्णधार रोहित शर्माचे दमदार अर्धशतक आणि अक्षर पटेलच्या अचुक गोलंदाजी यामुळे भारतीय संघाने तिसऱ्या आणि अंतिम टी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडवर 73 धावांनी दणदणीत विजय मिळवला. रोहित शर्मा मालिकावीर ठरला. तर अक्षर पटेलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 184 धावा केल्या. प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंड संघ 17.2 षटकांत 111 धावांत गारद झाला. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टीन गप्टीलने सर्वाधिक 51 धावा केल्या. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अक्षर पटेलने तीन विकेट घेतल्या. तर हर्षल पटेलने दोन गडी बाद केले.
तत्पू्र्वी भारतीय संघाचा कर्णधार रेहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा गेतलेला निर्णय अचुक ठरला. त्याने इशान किशनच्टया साथित संघाचा डाव सुरू केला. किशन मोठी खेळी करण्यात जरी अपयशी ठरला असला तरीही या जोडीने 69 धावांची सलामी दिली. किशन 21 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 29 धावा करुन बाद झाला.
त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव व ऋषभ पंत यांनी साफ निराश केली. मात्र, श्रेयस अय्यरने रोहितला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. अय्यरही स्थिरावल्यावर बाद झाला. दरम्यान रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. अय्यर मात्र, 20 चेंडूत 2 चौकार फठकावत 25 धावा करून तंबूत परतला. रोहित आज मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच बाद झाला. त्याने 31 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत 56 धावांची खेळी केली.
त्यानंतर आलेल्या व्यंकटेश अय्यर, दीपक चहर व हर्षल पटेल यांनी उपयुक्त फलंदाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. चहरने नाबाद 21 धावांची खेळी करताना 8 तेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावला. व्यंकटेश अय्यरने 15 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावत 20 धावांची खेळी केली. हर्षल पटेलने आक्रमक फलंदाजी करताना 11 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार मारताना 18 धावा केल्या.
भारताचा डाव 20 षटकांत 7 बाद 184 असा रोखला गेला. न्यूझीलंडकडून बदली कर्णधार मिचेल सॅंटनरने 3 गडी बाद केले. ट्रेंट बोल्ट, ऍडम मिल्ने, इश सोधी व लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.