Babar Azam big record in T20 cricket : सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग 2024 (PSL 2024) मध्ये बाबर आझमची बॅट जोरदार गर्जत आहे. पेशावर झल्मीच्या कर्णधाराने T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. लीगच्या सहाव्या सामन्यात त्याने अशी कामगिरी केली आहे की ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. बाबर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने ख्रिस गेल आणि विराट कोहलीसारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी करणारा तो 13वा फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे बाबरने 271 डावात हा टप्पा गाठला आहे. या बाबतीत त्याने भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मागे टाकले आहे. किंग कोहलीने T20 क्रिकेटच्या 299 डावांमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या.
पाकिस्तान सुपर लीग 2024 च्या सहाव्या सामन्यात कराची किंग्ज विरुद्धच्या सामन्यात बाबरने हा विक्रम केला आहे. कराची किंग्जविरुद्धच्या सामन्यात बाबरने 6 धावा करताच टी-20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यात यश मिळवले. बाबरने कराची किंग्ज विरुद्धच्या सामन्यात 72 धावांची इनिंग खेळली होती. आपल्या डावात बाबरने 51 चेंडूंचा सामना केला ज्यामध्ये तो 7 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
ख्रिस गेलला मागे टाकत बाबरने गाठले अव्वल स्थान…
बाबरच्या आधी वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल या बाबतीत आघाडीवर होता. त्याने 285 डावात 10 हजार धावा पूर्ण केल्या. मात्र, आता बाबरने त्याला मागे टाकले आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नरचे नाव आहे, ज्याने 327 डावांत ही कामगिरी केली. ॲरॉन फिंचनं देखील 327 डावांत ही कामगिरी केली आहे. त्याचवेळी जोस बटलरने टी-20 क्रिकेटमध्ये 350 इनिंगमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावा पूर्ण करणारे फलंदाज
271 डाव – बाबर आझम
285 डाव – ख्रिस गेल
299 डाव – विराट कोहली
327 डाव – डेव्हिड वॉर्नर
327 डाव – आरोन फिंच
350 डाव – जोस बटलर
बाबर आझम याची कारकीर्द…
पाकिस्तानसाठी बाबर आझमने 52 कसोटी सामन्यात 45.85 च्या सरासरीने 3,898 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 9 शतके आणि 26 अर्धशतके आहेत. 117 एकदिवसीय सामन्यांमध्ये माजी कर्णधाराने 19 शतके आणि 32 अर्धशतकांच्या मदतीने 5,729 धावा केल्या. याशिवाय 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या फलंदाजाच्या नावावर 3,698 धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने तीन शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत.
ICC Test Rankings : सलग 2 द्विशतकांचा जैस्वालला झाला मोठा फायदा, क्रमवारीत घेतली मोठी झेप…
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने यजमानपद भूषवलेल्या या स्पर्धेत संघाने नऊपैकी केवळ चार सामने जिंकले. संघाच्या खराब कामगिरीनंतर त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.