चेन्नई -सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन गुडघा दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याच्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, सनरायजर्स हैदराबादसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
30 वर्षीय नटराजनने या मोसमात सनरायजर्स हैदराबादकडून चारपैकी केवळ दोन सामने खेळले होते. या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला मूळतः दुखापत झाली होती. यानंतर ही दुखापत अद्यापही कायम आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आलेल्या प्रचंड तणावामुळे तो दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही.
बीसीसीआयच्या एका सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नटराजन आपल्या गुडघ्याच्या दुखापतीतून कधीच पूर्णपणे सावरला नव्हता. तो नॅशनल क्रिकेट ऍकॅडमी येथे पुनर्वसनासाठी गेला होता. पण इंग्लंडविरुद्ध मालिकेपूर्वी त्याला तंदुरुस्त घोषित केले गेले होते. तरीही तो 100 टक्के फिट नव्हता. दरम्यान, योग्य पुनर्वसन न करता त्याने पुनरागमन केल्याने आता तो जास्त काळ बाहेर राहू शकतो, अशी माहिती दिली.