दमास्कस – सीरियाने इस्त्रायलची काही क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. दक्षिण सीरियाच्या दिशेने इस्त्रायलने ही क्षेपणास्त्र डागली होती. ती आमच्या एअर डिफेन्स सीस्टीमने पाडून टाकली असे सीरियाने म्हटले आहे. गोलन हाईट्स जवळील ताल अल हरा या दिशेने इस्त्रायलने ही क्षेपणास्त्रे डागली होती. तेथील हिजबुल्ल गनिमांची ठिकाणे उद्धवस्त करणे हा त्यांचा इरादा होता. इस्त्रायलने आमच्या विरोधात केवळ क्षेपणास्त्र हल्लेच केलेले नाहींत तर त्यांनी आमच्या विरोधात इलेक्ट्रॉनिक युद्धही छेडले असल्याचा दावा सीरियाने केला आहे.
इस्त्रायलने सीरियन रडार यंत्रणेच्या संदेश वहनाला जामर लावल्याचेही आढळून आले आहे. इस्त्रायलने लेबनॉन मधील हेजबुल्लांच्या ठिकाणांवर मात्र यशस्वी हल्ले केले असल्याचे वृत्त ब्रिटीश निरीक्षकांनी दिले आहे. इस्त्रायल आणि सीरियात सन 2011 पासून संघर्ष सुरू आहे. या अवधीत आत्तापर्यंत शेकडोवेळा इस्त्रायलने सीरियाच्या हद्दीत हवाईहल्ले व क्षेपणास्त्र मारा केला आहे.सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्याशी निष्ठावान असलेल्या फौजा आणि इराण तसेच हेजबुल्ला समर्थकांना नेस्तानबूत करण्यासाठी इस्त्रायलने हे हल्ले केले आहेत.
इराणला आम्ही सीरियाच्या हद्दीत बस्तान बसू देणार नाही असा निर्धार इस्त्रायलने व्यक्त केला आहे. इराणने सीरिया मधील बशर अल असद सरकारला पाठिंबा दिला आहे. आणि असद सरकार उलथवून टाकण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी इराण प्रयत्नशील आहे. गेली आठ वर्ष सीरियात ही संघर्ष स्थिती असून त्यात आत्तापर्यंत सुमारे 3 लाख 70 हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.