राज्यात 9 महिन्यांत 2 हजार व्यक्‍तींना स्वाईन फ्लू

पुणे -राज्यात मागील 3 महिन्यांपासून स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जानेवारी ते 19 सप्टेंबर 2019 पर्यंत राज्यात 2 हजाराहून अधिक रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सध्या 90 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 212 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याच्या साथरोग विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 205 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 212 रुग्णांनी जीव गमावला असून, त्यापैकी सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यात झालेले आहेत. नाशिकमध्ये 33, नागपूर 27, अहमदनगर 20 तर पुणे शहरातील 17 रुग्णांचा समावेश आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पुणे शहरातील रुग्णांच्या मृत्यूंची संख्या घटली आहे. परंतु, नागरिक आणि आरोग्य विभागाने गाफील न राहता आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी.

दरम्यान, पुणे शहरात जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 168 इतकी झाली आहे. तर 12 हजार 153 संशयीत रुग्णांना टॅमीफ्लू देण्यात आले आहे. गेल्या 4 दिवसांत दररोज एक रूग्ण आढळून येत असल्यामुळे प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याचे दिसून येते. शुक्रवारी (दि. 20) दिवसभरात साडेचार हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 76 संशयित व्यक्‍तींना टॅमीफ्लू देऊन घरी आराम करण्याचा सल्ला दिला. तर दोन रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.