सातारा जिल्ह्यात यावेळी बहुरंगी लढतींचीच शक्‍यता

 भावनेचे राजकारण, विकासाची प्रतीक्षाच

सातारा जिल्ह्यातील राजकीय उलथापलाथींमुळे विधानसभा निवडणुकीत चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने मारलेल्या मुसंडीमुळे दोन्ही कॉंग्रेसपुढे आव्हान निर्माण केले आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लढती अनपेक्षित रंगत वाढविणाऱ्या ठरणार आहेत. काही जणांची उमेदवारी निश्‍चित मानण्यात येत आहे. काही अजून द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे दुरंगी लढतीपेक्षाही तिरंगी किंवा बहुरंगी लढतींचीच शक्‍यता आहे.

चव्हाण-भोसले यांच्यात चुरस
कराड दक्षिणची लढत कॉंग्रेस आणि भाजप प्रतिष्ठेची करणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यंदाही येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली. दुसरीकडे गेल्या वेळी हुलकावणी दिलेला विजय मिळविण्यासाठी भाजपच्या अतुल भोसले यांनी चंग बांधला आहे. भोसले यांनी गेल्या पाच वर्षांत आपली प्रतिमा अधिक बळकट केली आहे. त्यातही विलासराव पाटील-उंडाळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील-उंडाळकर हेदेखील इच्छुक आहेत. त्यामुळे दक्षिणच्या पट्ट्यातील लढत दुरंगी होणार की तिरंगी, यावर इथली गणिते बदलत राहणार आहेत.

गोरे बंधूंमध्ये थेट लढतीची शक्‍यता
माण-खटावमध्ये गोरे भावांची लढत रंगण्याची शक्‍यता आहे. आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेल्या जयकुमार गोरे यांना कोणत्याही स्थितीत पराभूत करायचे, असा चंग बांधून भाजप बंडखोरांसह कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी “आमचं ठरलंय’ म्हणत दंड थोपटले; परंतु मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत जयकुमार गोरे यांना दिलले बळ पाहून “ठरलंय’च्या गोटाची हवाच निघाली आहे. जयकुमार यांचे बंधू शेखर गोरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून माणमध्ये आपला दावा सांगितला आहे. राष्ट्रीय समाज पक्षानेही हा मतदारसंघ मिळविण्याच्या खटपटी सुरू ठेवल्या आहेत. युतीत जागा कोणाच्या वाट्याला येणार, याचे कोडे शेवटपर्यंत राहणार आहेच. त्यामुळे कोणत्याही पक्षात सध्या कोणीही असले तरी ऐनवेळी रिंगणात कोण कुठल्या पक्षाकडून पुढे येते, याची उत्सुकता आहे.

मदन भोसलेंपुढे मकरंदआबांची प्रतिष्ठा पणाला
कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे चिरंजीव व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने वाईमध्येही काट्याची लढाई दिसण्याची शक्‍यता आहे. विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचा दांडगा संपर्क आणि गावोगावी असलेली कार्यकर्त्यांची फळी यामुळे राष्ट्रवादीच्या अभेद्य वाटणाऱ्या वाईच्या किल्ल्याला भाजपने मदन भोसले यांच्या माध्यमातून धक्‍का देण्याची तयारी केली आहे.
वाई, महाबळेश्‍वर आणि खंडाळा या तिन्ही तालुक्‍यांमधील काही प्रमुख नेते भाजपच्या गोटात गेल्याने हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी भाजप प्रतिष्ठा पणाला लावेल. चुरस वाढली असली तरी शिवसेनेची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

शशिकांत शिंदे यांच्यापुढे महेश शिंदेंचे आव्हान
कोरेगावमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांच्यापुढे भाजपच्या महेश शिंदे यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. महेश शिंदे यांनी गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघ पिंजून काढत गावोगावी आपल्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे नाराजांनीही भाजपचा रस्ता धरला.

पाटील-घोरपडे यांच्यात लढत?
कराड उत्तरमध्ये विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांची मोठी ताकद आहे. त्यांच्या सह्याद्री साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रही मतदारसंघात येत असल्याचा फायदा त्यांना मिळतोच.शिवाय भाजपकडून मनोज घोरपडे यांचे नाव निश्‍चित मानले जात असले तरी धैर्यशील कदमांच्या प्रवेशाची टांगती तलवार अजून कायम आहे. खरे तर कदम यांचे पाऊल कोणत्या पक्षात पडणार, हे निश्‍चित नाही. त्याशिवाय युतीमध्ये मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास स्थिती बदलण्याची शक्‍यता आहे.

शिवेंद्रराजेंपुढे उमेदवार कोण?
शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेल्याने सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीपुढे उमेदवार शोधण्याचे आव्हान आहे. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभूराज देसाई व पाटणकर घराण्यातील पारंपरिक संघर्ष यावेळीही दिसणार आहे. शंभूराज यांच्यापुढे सत्यजितसिंह पाटणकर यांचे आव्हान असेल. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका निश्‍चित नसल्याने सारीच अनिश्‍चितता आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने तिथे आव्हान आहे. मात्र, उमेदवार निश्‍चित होईपर्यंत इथले वारे संथ वाहणार आहेत.

मतदारसंघाच्या समस्या काय?
या मतदारसंघातून पैनगंगा, कयाधु अशा दोन मोठ्या नद्या वाहतात. मात्र, सिंचनासाठी इसापूर धरणावरच शेतकऱ्यांना अवंलबून राहावे लागत. यंदा पावसाअभावी हे धरण भरले नसल्याने आगामी काळात शेतीला पाणी कसे द्यायचे, हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. पर्यायी सिंचन व्यवस्था येथे उभारण्यात राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. उद्योगधंदे तर येथे नावालाही नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. तरुणांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही. वर्षानुवर्षे हेच मुद्दे निवडणुकीत येतात, पण त्याकडे राज्यकर्ते गांभीर्याने पाहत नाहीत. उलट येथील निवडणूक जातीपातीच्या मुद्यावर भरकटत जाते आणि संपतेही.

नांदेड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या सोबत राहणारा हा मतदारसंघ आहे. यापूर्वी शिवसेनेकडून हिंगोलीचे खासदार आणि हदगाव-हिमायतनगरचे आमदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी मागील लोकसभा निवडणुकीपासून सतत उड्या मारल्या आहेत. तरीही, येथून शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. असे असले, तरी विकासाचा मोठा अनुशेष या मतदारसंघात आहे. कारण, फक्‍त भावनेच्या भरात मतदान केल्यानंतर काय होते, हे येथील जनतेला आता कळून चुकले असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here