मुंबई – अभिनेता अक्षयकुमारचा रामसेतू हा चित्रपट ऐन दिवाळीत प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याच बातमी आहे. चित्रपट व्यवसायाशी संबंधित जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाबद्दल सगळीकडून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्यामुळे अक्षयची आणि एकूणच हिंदी चित्रपटसृष्टीची ही दिवाळी गोड ठरण्याची शक्यता आहे.
2022 हे वर्ष कलाकार म्हणून अक्षयकुमारला फारसे चांगले गेले नाही. या वर्षात प्रदर्शित झालेल्या त्याच्या बहुतेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयशाचा सामना करावा लागला. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज आणि रक्षाबंधन हे त्याचे तीन बडे चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, रामसेतूला चांगली ओपनिंग मिळणे ही निश्चितच त्याच्यासाठी समाधानाची बाब असणार आहे.
अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस आणि नुसरत भरूचा यांच्याही चित्रपटात भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होत व सकारात्मक चर्चाही सुरू झाली होती. ब्रह्मास्त्रच्या ट्रेलरनेही लोकांची अशीच उत्कंठा जागवली होती व ब्रह्मास्त्रला जोरदार यश मिळाले.
सोशल मीडियावरही रामसेतूबद्दल लोक व्यक्त होताना दिसत असून काहींनी तर चित्रपटाला सर्वोत्तम रेटींग दिले आहे. प्रभू श्रीरामांवर भारतीयांची असलेली श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान यांची उत्तम सांगड घालून हा चित्रपट मनोरंजक झाला असल्याचे सांगण्यात येते.