पुणे – स्वारगेट बस स्थानकाच्या सातारा रस्त्यावरील प्रवेश द्वारासमोरील पंचमी हॉटेलकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे सुमारे 16 मीटर रेलिंग तोडण्यात येणार आहे. मेट्रोचे ट्रान्स्पोर्ट हब आणि स्वारगेट बस स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. या मार्गासाठी हे रेलिंग तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे, पुलाचे काम करताना भुयारी मार्गाचा विचार केला नव्हता का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून चार वर्षांपूर्वी या पुलाचे काम केले आहे. देशभक्त केशवराव जेधे चौकातून सातारा रस्त्याकडे जाणारा हा पूल आहे. पुलाच्या एका बाजूला मेट्रोच्या ट्रान्सपोर्ट हब, तर दुसऱ्या बाजूला स्वारगेट बसस्थानक असणार आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी प्रवाशांना सहजपणे येता जाता यावे, यासाठी मेट्रोकडून भुयारी मार्ग करण्यात येणार आहे.
पुलाच्या सुरूवातीच्या ठिकाणी एन्ट्री आणि एक्झिट गेट प्रस्तावित आहे. या गेटसाठी पुलाच्या डाव्या बाजूला असलेली जागा कमी पडत आहे. त्यामुळे या रेलिंग काढण्याचे पत्र महामेट्रोने महापालिकेला दिले होते. पण, हा पूल “एमएसआरडीसी’ने बांधलेला असल्याने त्यांच्याकडे मेट्रोचे पत्र तसेच नकाशे पाठवले होते. त्यानंतर, “एमएसआरडीसी’ने पुलाचे रेलिंग तोडण्यास संमती दर्शवल्यानंतरही पालिकेने पुलाचे रेलिंग तोडण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे महामेट्रोने बुधवारी सकाळीपासून हे रेलिंग ब्रेकरने तोडण्यास सुरूवात केली आहे.