वायसीएमकडून निगेटिव्ह, तालेरा म्हणते पॉझिटिव्ह
पिंपरी (प्रतिनिधी) – एकाच रुग्णाचा महापालिकेची दोन रुग्णालये वेगवेगळे करोना अहवाल सांगत असल्याने त्या रुग्णाची आणि नातेवाइकांची धांदल उडाली. महापालिका प्रशासनाच्या अशा निष्काळजीपणामुळे करोनाचा संसर्ग अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वायसीएम रुग्णालयात संगणकातील तांत्रिक चुकीने संबंधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह गेल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाने एका रुग्णाला करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असून ‘घरी जा’ असे सांगितले. दरम्यान, चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयाचे कर्मचारी रुग्णाचे घरी पोहचले आणि अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगू लागले. अशा प्रकारे एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे अहवाल देऊन हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष ऍड. सागर चरण यांनी केली आहे.
बिजलीनगर येथील 58 वर्षीय रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालय येथे ते करोना तपासणीसाठी 14 ऑगस्ट रोजी गेले होते. त्या वेळी डॉक्टरांनी त्यांची रॅपीड अँटीजेन टेस्ट घेऊन त्यांना घरी जाण्यास सांगितले.
संबंधित रुग्णाला 19 तारखेला श्वास घेण्यासाठी जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. मात्र, तेथे उपचारासाठी पूर्ण पैसे उपलब्ध नसल्याने त्यांना वाय.सी.एम. रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली. तसेच, त्यांना रुग्णालयात दाखल केले.
“वायसीएम रुग्णालयात संगणकातील तांत्रिक चुकीमुळे संबंधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह गेला होता. प्रत्यक्षात तो रुग्ण पॉझिटिव्ह होता. अहवाल निगेटिव्ह गेल्याने संबंधित रुग्णाला घरी सोडण्यात आले. मात्र, ही चूक त्यानंतर दुरूस्त करण्यात आली.”
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, यशवंतराव चव्हाण रुग्णालय पदव्युत्तर संस्था.
दरम्यान, 22 ऑगस्टला सकाळी त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र, त्याच दिवशी दुपारी बाराच्या सुमारास तालेरा रुग्णालयाचे काही कर्मचारी त्यांच्या घरी गेले. तसेच, संबंधित रुग्णाला करोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे सांगितले.
“तालेरा रुग्णालयात 14 ऑगस्टला रुग्णाची रॅपीड अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीत रुग्ण निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर, संबंधित रुग्णाला लक्षणे सुरू झाली. त्यांचे वायसीएममध्ये “स्वॅब’ घेण्यात आले. त्यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, संगणकीय तांत्रिक चुकीमुळे तो अहवाल निगेटिव्ह गेला. आयसीएमआरच्या पोर्टलवर मात्र रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती होती. त्यामुळे त्याबाबत त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आले.”
– डॉ. सुनील जॉन, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी, तालेरा रुग्णालय.
रुग्णाच्या कुटुंबियांनी याबाबत वाय.सी.एम. रुग्णालयातील डॉक्टरांना सांगितले. वायसीएमच्या डॉक्टरांनी मात्र सांगितले की तुमचा रुग्ण बरा झाला आहे. तुम्ही त्याला लवकरात लवकर घरी घेऊन जा. मात्र, तालेरा रुग्णालयातील कर्मचारी सांगत होते की, रुग्णाला घरी आणू नका, त्यांना वायसीएममध्येच राहू द्या.
एकाच व्यक्तीचे दोन रिपोर्ट कसे?
वायसीएम रुग्णालय प्रशासन करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे सांगत होते. तर, तालेरा रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णाला करोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत होते. एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे रिपोर्ट कसे काय असू शकतात? तालेरा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यासाठी एवढा विलंब का लावला? यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपण दिसून येत आहे. संबंधित घटनेची तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी. तसेच, यामध्ये हलगर्जीपणा करणारे अधिकारी/डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी अॅड. सागर चरण यांनी केली आहे.