नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पक्षाला अल्टीमेटम दिला आहे. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांना 24 तासांच्या आत पदावरून हटवण्यात यावे. अन्यथा स्वत:चा बचाव करण्यासाठी मला प्रत्युत्तर द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना दिला आहे.
स्वामी यांनी ट्वीट करून मालवीय यांना हटवण्याचा प्रस्ताव नड्डा यांच्यापुढे ठेवला आहे. जर मालवीय यांना पदावरून दूर केले नाही, तर पक्षाला माझा बचाव करण्यात स्वारस्य नाही, असा याचा अर्थ होईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पक्षात कोणतेही व्यासपीठही नाही. अशा स्थितीत मला स्वत:चा बचाव करण्यासाठी मैदानात उतरावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. मालवीय अर्थात भाजपचा आयटी सेल स्वामी यांच्यावर सातत्याने टीका करणारे ट्वीटस करत असल्यामुळे स्वामी नाराज आहेत.
भाजपचा आयटी सेल माझ्यावर व्यक्तीगत हल्ला आणि टीका करतो आहे. त्याकरता पक्षाला जबाबदार धरले जाउ शकत नाही. त्याचप्रमाणे जर माझ्या समर्थकांनीही व्यक्तीगत हल्ला सुरू केला तर मलाही जबाबदार धरले जाउ शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती आणि जेईई- नीट परीक्षेच्या मुदद्दयावरून स्वामी यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.