इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याविरोधात विशेष न्यायालयात सुरू असलेल्या देशद्रोहाच्या खटल्याचा अंतिम निकाल सुनावणीला आज पाकिस्तानातील न्यायालयाने स्थगिती दिली. या खटल्याचा निकाल उद्या (गुरुवारी) सुनावला जाणार होता.
पण सुनावणीला स्थगिती मिळाल्यामुळे मुशर्रफ यांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी मुशर्रफ यांना फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. 2016 च्या मे महिन्यात वैद्यकीय उपचारांसाठी मुशर्रफ पाकिस्तानातून बाहेर गेले आहेत. ते तेंव्हापासून परत आलेले नाहीत. ते सध्या दुबईमध्येच रहात आहेत.
आपल्यविरोधातील देशद्रोहाचा खटल्याला त्यांनी लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा खटलाच बेकायदेशीर आणि अर्थहीन असल्याचा दावा मुशर्रफ यांच्या वकिलांनी 19 नोव्हेंबरच्या सुनावणीच्यावेळी सांगितले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोमवारी अचानक मुशर्रफ यांची बाजू घेतली आणि त्यांच्याविरोधातील देशद्रोहाच्या खटल्याच्या निकालाची सुनावणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. देशद्रोहाच्या खटल्यात दोषी ठरल्यास मुशर्रफ यांना फाशी किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.
मुशर्रफ यांनी 3 नोव्हेंबर 2007 रोजी राज्यघटना स्थगित करून देशात आणीबाणी लागू केली होती. विशेष न्यायालयाने या प्रकरणातील युक्तीवाद 19 नोव्हेंबर रोजी पूर्ण केला आणि अंतिम निकाल 28 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल, असे जाहीर केले होते. निकाल पुढे ढकलला गेला असला तरी त्यामागील कारण विशेष न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही.