नगर – प्रयत्नांची पराकाष्टा करून शहरातील ठाकरे- शिंदे गटाच्या नगसेवकांनी 15 कोटी कामांवरील स्थगिती उठवून या सिव्हिल हडको व केडगाव उपनगरातील रस्त्याच्या कॉक्रिटीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा केला होता. मात्र हा आनंद महापौरांना केवळ चार ते पाच दिवस मिळाला. आज शिंदे, फडणवीस व पवार यांच्या सरकारने ही सर्व कामे रद्द केली असून या सर्व 15 कोटींचा निधी थेट इंडस्ट्रीयल इस्टेटमधील कामांना दिला आहे. त्यामुळे महापौर रोहिणी शेंडगे यांनी डोक्यालाच हात लावला आहे. अचानक झालेल्या या निर्णयामुळे केडगावमधील कामे पुन्हा एकदा ठप्प झाली आहेत.
महापालिकेत शिवसेनेचा महापौर असल्याने तत्कालीन नगरविकास मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर शहरात 15 कोटींच्या निधीतून केडगाव येथे झेंडा चौक ते वैष्णवनगर, भूषणनगर येथे राधेश्याम कॉम्प्लेक्स ते फुंदे घर, अयोध्यानगर चौक ते शंभूराजे चौक, रभाजीनगर सापते घर ते पवन कोतकर घर, मुरकुटे घर ते नेप्ती रोड, सिव्हील हडको येथील मेघाग्नी चौक ते हिरानंदानी मार्ग ते भगत मळा ते गणेश चौक ते मकासरे हेल्थ क्लब व पराग कॉर्नर ते भगत मळा, तसेच इंडस्ट्रीयल इस्टेटमधील 12 रस्ते मंजूर केले होती. या कामांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. त्यामुळे या कामांच्या निविदा प्रक्रियाही राबवण्यात आल्या. मात्र, ठाकरे – शिंदे गटातील राजकीय वादातून या कामांना 25 जुलै 2022 रोजी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे ही कामे रखडली होती.
वर्षभरानंतर 25 जुलै 2023 रोजी राज्य सरकारने या निधीला दिलेली स्थगिती उठवली. मात्र, त्यानंतर दोनच दिवसात 27 जुलै रोजी राज्य सरकारने या 15 कोटींच्या निधीतील सिव्हील हडको व केडगाव येथील 10 कोटींची कामे रद्द केली आहेत. या संपूर्ण 15 कोटींच्या निधीतून आता केवळ इंडस्ट्रीयल इस्टेटमधील रस्त्यांचीच कामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. दरम्यान, या आदेशामुळे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
15 कोटींचा निधीतून 12 कामे होणार
इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अर्बन बॅंक ते सुमेश इंडस्ट्रीज, महावीर इंडस्ट्रीज ते सौरभ इंडस्ट्रीज, मे. नेक टेक्निकल ते सारडा फॅशन्सपर्यंत, टो इंजिनिअर्स ते चोपडा पॉलीपर्यंत, मे.धनलक्ष्मी एंटरप्रायझेस ते न्यु दत्त मुद्रणालयपर्यंत, मे. सुप्रिम इंडस्ट्रीयल ते आझाद सॉ मीलपर्यंत, यशका इंडस्ट्रीज ते मायक्रोटेक इंडस्ट्रीज, ओम इलेक्ट्रीकल्स ते सुचि इंजिनिअरिंग, इंडस्ट्रीयल गेट ते नवकार स्टोअर व रुपरतन मेटल ते महावीर फरसाणपर्यंत, बोगावत फॅक्टरी ते श्री प्लॅस्टिक, मे. बोरा मेटल इंडस्ट्रीज ते वंदन इंजिनिअरिंग, मे. आदित्य पॅकेजिंग ते मे. रवी बटपर्यंत अशी 12 रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.