लंडन – रेल्वेमंत्रालयातील कारभार अधिक पारदर्शक करण्यासाठी रेल्वेखात्यातील भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी दिली. ते म्हणाले की या कर्मचाऱ्यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी मोहीमे अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. ब्रिटन मधील भारतीयांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. गोयल सध्या तीन दिवसांच्या ब्रिटन भेटीवर आले आहेत. ते म्हणाले की अनेक सरकारी विभागातील भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
मी माझ्या रेल्वेखात्यातील कर्मचाऱ्यांचेही रेकार्ड तपासण्याचे आदेश दिले आहेत. भ्रष्टाचार मुक्त भारत ही आमची संकल्पना असून त्यादृष्टीने आम्ही कामाला सुरूवात केली आहे.केंद्र सरकारच नव्हे तर ज्या राज्यांत आम्ही सत्तेवर आहोत तेथेही आम्हीं या दृष्टीनेही काही उपाययोजना करीत आहोत असे ते म्हणाले.