कराड, (प्रतिनिधी) – घरफोडी, चोर्या, असे गंभीर गुन्हे करून नऊ वर्षे फरारी असलेल्या दीपक महादेव थोरात (रा. वाकुर्डे बुद्रुक, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. राम मंदिरासमोर, करवडी, ता. कराड) याला कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विद्यानगर (कराड) येथील संजय तुकाराम देसाई यांच्या घरातून दोन संशयितांनी मोबाइल 2015 साली चोरून नेला होता.
याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक फौजदार एस. आर. जाधव यांनी तपास करून आनंदा भिकाजी थोरात (रा. वाकुर्डे, ता. शिराळा) याला अटक केली होती, तर दीपक थोरात हा नऊ वर्षे पसार होता. याप्रकरणी दीपक थोरातला फरारी दाखवूनण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
यातील फरारी संशयिताला पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांनी कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. दीपक थोरात हा कराड परिसरात आल्याची माहिती कोंडीराम पाटील यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पोलीस पथक तेथे गेले असता, दीपक थोरात याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस अंमलदार आनंदा जाधव यांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सपोनि संजय देवकुळे तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस अंमलदार विकास सपकाळ, शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, आनंदा जाधव, महेश शिंदे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.