कराड, (प्रतिनिधी) – कालेटेक, ता. कराड येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळ उघड्यावर ठेवलेल्या दीड टन वजनाच्या स्टीलच्या चोरीचा गुन्हा कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या तीन तासांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुखदेव सर्जेराव मोरे (रा. भवानीनगर, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. कालेटेक, ता. कराड) याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे स्टील आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा, एकूण तीन लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कालेटेक येथे डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळ उघड्यावरील 90 हजार रुपयांचे दीड टन स्टील चोरीस गेल्याची फिर्याद विकास जगन्नाथ पाटील यांनी काल (दि. 2) कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे सोपवण्यात आला होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार उत्तम कोळी, पोलीस अंमलदार नितीन येळवे, सचिन निकम, सज्जन जगताप, प्रफुल्ल गाडे यांनी पाचवड फाटा, ता. कराड येथे सापळा रचला. सुखदेव मोरे हा चोरीचा माल विकायला घेऊन जात असताना, पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये चोरीचे स्टील आढळले. पोलिसांनी स्टील व वाहन जप्त केले. हवालदार उत्तम कोळी तपास करत आहेत.