पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील शिव छत्रपती क्रीडांगण येथे जागतिक सूर्य नमस्कार दिवस निमित्ताने नगरसेवक शत्रुघ्न काटे यूथ फाउंडेशन व योगांजली स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करीत असल्याचे सुचक आहे.
कार्यक्रमाची सुरुवात शत्रुघ्न काटे आणि अंजली खोकले यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी शत्रुघ्न काटे आणि अंजली खोकले यांनी व्यासपीठावर सूर्य नमस्कारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
सूर्यनमस्कार ही सूर्याला आदर देण्याची एक प्राचीन योगिक पद्धत आहे. सूर्यनमस्कार 12 योग मिळून बनला आहे. शारीरिक व्यायाम हा शरीर व मनही निरोगी ठेवण्याबरोबरच बौद्धिक क्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक आहे, असे शत्रुघ्न काटे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री मॅडम आणि रेणु मॅडम यांनी केले.