जागतिक बँक पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी 

115 टीएमसी दुष्काळग्रस्त भागात ; कृष्णा-भिमा स्थिरीकरण प्रकल्पाचे सादरीकरण 

कोल्हापूर: जागतिक बँकेच्या पथकाने आज जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पुराद्वारे वाहून जाणारे 115 टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त भागात पोहचविणारा 201 कि.मी लांबीचा 27 हजार कोटी किंमतीच्या कृष्णा-भिमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पाचे   जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी पथकापुढे सादरीकरण केले. हे पथक गुरुवारी मुख्यमंत्री, तसेच मुख्य सचिव यांच्याशी चर्चा करणार आहे.

जिल्ह्यात दाखल झालेल्या पथकामध्ये अनुप कारनाथ, पीयुष शेखसरीया, पूनम अहलुवालिया, राज सिंग, रंजन सामंतराय, युकीओ टनाका, आय जसब्रँड एच डी जोंग, विजयशेखर कलवाकोंडा, इड्यूरडो फेरियरा यांचा समावेश होता.

आज सकाळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. सादरीकरणात रस्ते, पूल, घरे, धरण, महावितरण, पीक, जमीन यांचा समावेश होता. त्याचबरोबर भविष्यामध्ये महापूर आल्यास नुकसान होणार नाही असे प्रस्तावित प्रकल्पांचाही समावेश होता. यात प्रामुख्याने राधानगरी धरणाचे सध्याचे स्वयंचलित दरवाज्यांबरोबरच नवीन हैड्रोलीक दरवाजे बसविणे, धामणीच्या अपूर्ण प्रकल्पास 250 कोटी मिळाल्यास 3.85 टीएमसी पाणी साठवता येईल.

महामार्ग उंच करणे, पूरग्रस्त भागातील रस्ते उंच करणे, आवश्यक त्याठिकाणी उड्डाण पूल करणे, महावितरणचे केंद्र उंचावर बसविणे, विजेचे उंच खांब (मोनोपोल) बसविणे, अंशत: तसेच पूर्णत: बाधित झालेल्या घरांची पुनर्बांधणी, धरण क्षेत्राच्या खाली रेनगेज नेटवर्क आणि जिल्ह्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष करुन गावांना पूर्व सूचना देणे, प्रस्थापित 10 हजार हेक्टरवर सरफेस ड्रेनेज यंत्रणा या विषयांवर चर्चा करण्यात आली.

सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनीही सांगली जिल्हयाबाबत सादरीकरण केले.
कृष्णा-भिमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पकृष्णा, पंचगंगा, वारणा आणि भिमा नदीमधील जादाचे 115 टिएमसी पाणी 201 कि.मी. भोगदयाच्या माध्यमातून भिमा, निरा आणि कृष्णा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागात पोहचविण्यात येणार आहे. 27 हजार कोटी किंमतीचा हा प्रकल्प असून पुणे जिल्ह्यातील दोन, सोलापूर जिल्ह्यातील अकरा, उस्मानाबाद जिल्ह्यातील एक, सातारा जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा याचा फायदा होणार आहे. हे पाणी कुंभी, कासारी, कडवी, वारणा, कोयना, कृष्णा, निरा, भिमा अशा नदी प्रदेशातून पुढे मराठवाड्यात नेण्याचे प्रस्तावित आहे.

यानंतर एका पथकाने बापट कॅम्प येथील महावितरण केंद्राची पाहणी करुन शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड, आकीवाट, खिद्रापूर भागाची पाहणी केली. यामध्ये झालेल्या नुकसानीबाबत ग्रामस्थांशी चर्चाही केली. दुसऱ्या पथकाने महापालिका क्षेत्रातील महावीर गार्डन, शिंगणापूर पंपींग स्टेशन, दुधाळी एसटीपी प्लँट, कुंभार गल्ली भागातील नुकसानीची पाहणी केली. तसेच मुस्लिम बोर्डींग येथील शिबीरालाही भेट दिली. तिसऱ्या पथकाने राधानगरी धरणाला भेट देवून पाहणी केली. याठिकाणी कृष्णा-भिमा स्थिरीकरण जलनियोजन प्रकल्पावर सुमारे दीड तास चर्चा झाली. पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ, कार्यकारी अभियंता संजय पाटील, रोहित बांदिवडेकर यांनी या प्रकल्पाबाबत तसेच हैड्रोलिक दरवाजे बसवण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)