इस्रायलकडून गाझा पट्टयातल्या हल्ल्याचे समर्थन

जेरुसलेम – इस्रायलने गाझा पट्टयातल्या दहशतवादी अड्डयांवर केलेल्या रॉकेट हल्ल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी जोरदार समर्थन केले आहे. इस्रायलच्या या रॉकेट हल्ल्याला रविवारी आणखीनच धार आली होती. हा रॉकेट मारा गाझा पट्टयातील दहशतवादी गटांवर अधिक जोरदारपणे करण्यास आपणच लष्कराला सांगितले आहे. तसेच सीमेजवळ रणगाडे, तोफखाना आणि पायदळाला सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत, असे नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच सांगितले.

पॅलेस्टाईनच्या हद्दीतून इस्रायलवर जवळपास 450 रॉकेट आणि मोर्टारचा मारा करण्यात अला आहे आणि ही रॉकेट हमासनेच इस्रायलवर सोडली असल्याचा दावाही नेतान्याहू यांनी केला. या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलनेही रॉकेटचा जोरदार मारा सुरू केला आहे. त्या जोडीला हवाई हल्ले आणि रणगाड्यांमधूनही तोफगोळ्यांचा मारा करायला इस्रायलने सुरुवात केली आहे. या हल्ल्यामध्ये 6 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. त्यामध्ये किमान दोन दहशतवाद्यांचाही समावेश आहे. या हल्ल्यात एक गर्भवती महिला आणि लहान बाळाचाही मृत्यू झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. मात्र इस्रायलने हा दावा फेटाळला आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संयुक्‍त राष्ट्र आणि इजिप्तच्या पुढाकाराने शस्त्रसंधी झाली होती. मात्र गेल्या आठवड्यात हमासने इस्रायलकडून अधिक सवलती मागितल्याच्या निमित्ताने पुन्हा संघर्षास सुरुवात झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.