मुंबई – शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट साक्ष अखेर संपली. शिंदे गटाकडून तब्बल 318 प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. शिंदे गटास (Shinde group) उलट साक्ष घेण्याचा आज अखेरचा दिवस होता.
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज नियमित सुनावणी पार पडली. ही सुनावणी गेल्या दोन आठवड्यांपासून नियमितपणे सुरु आहे. सुनील प्रभू यांची दररोज पाच ते सहा तास सलग फेरसाक्ष नोंदवली जात होती. या दरम्यान सुनील प्रभू यांना घेरण्यासाठी महेश जेठमलानी (Mahesh jethmalani) यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले.
या सुनावणीत आज ठाकरे गटाने बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश ज्या मेल आयडीवर दिले होते, तो मेल आयडी एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांचा नाहीच, असा दावा शिंदेंच्या वकिलाने केला होता. मात्र ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट पुरावाच सादर केला.
आम्ही मेल पाठवलेला ईमेल आयडी हा एकनाथ शिंदे यांचा खरा ईमेल आयडी आहे, जो विधानसभा सदस्यांच्या यादी पुस्तिकेत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेल्या पत्राच्या ईमेल आयडीबाबत शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केले होते. तसेच ईमेल आयडी चुकीचा असल्याचे अध्यक्षांना दिलेल्या अर्जात सांगितले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून यासंदर्भात पुराव्यासह उत्तर सादर करण्यात आले आहे.
ठाकरे गटाकडून उत्तर दाखल करत असताना 20 जून 2022 रोजीच्या महाराष्ट्र विधानसभा सदस्यांची यादी पुस्तिका, आपल्या उत्तरांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये राज्यातील सर्व आमदारांचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि त्यासोबतच ईमेल आयडी आहे.
विजय जोशी यांची उलट तपासणी
सुनील प्रभू यांची उलट तपासणी संपल्यानंतर शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालयीन सचिव विजय जोशी यांची उलट तपासणी शिंदे गटाकडून घेण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे वकील ॲड. महेश जेठमलानी यांच्याकडून जोशी यांच्यावर व्हीप ड्राफ्ट, व्हीप कोणी दिला यासारखे प्रश्न केले. या प्रश्नांना विजय जोशींकडून उत्तरे देण्यात आली.