हिंजवडी – मारुंजी येथील पै. अमोल बुचडे कुस्ती संकुलाचा खेळाडू सुमितकुमार लक्ष्मण भारस्कर याने 17 वर्षांखालील राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करत 71 किलो फ्रीस्टाइल वजन गटात सुवर्णपदक पटकाविले.
महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग यांनी कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथे राज्यस्तरीय सतरा वर्षाखालील शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सुमितकुमारने सुवर्णपदक पटकाविले. त्याने केलेल्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्याची राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती. राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धा मध्य प्रदेशमध्ये झाल्या. यामध्ये महाराष्ट्राच्या 17 वर्षांखालील कुस्ती संघ सहभागी झाला. या संघामध्ये 71 किलो फ्रीस्टाइल वजन गटात सुमितकुमारने राज्याचे नेतृत्व करत 71 किलो वजन गटात अनेक नेत्रदीपक कुस्त्या केल्या.
विविध राज्यांच्या खेळाडूस पराभूत करून महाराष्ट्रास सुवर्णपदक प्राप्त करून दिले. महाराष्ट्र केसरी रुस्तम ए हिंद, पैलवान अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करत आहे. मागील तीन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके प्राप्त केली आहेत. सुमितच्या या यशाबद्दल वस्ताद अमोल बुचडे, कोच नरेंद्र कुमार, पवन गोरे, महेश पाटील, अकादमीचे मार्गदर्शक प्रा. किसन बुचडे, कपिल बुचडे, विनोद गोरे, एपीआय मिलिंद झोडगे, प्रा. संतोष पवार, प्रा. महेश घुले यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.