सुखराम यांचे मंत्रीपुत्र भाजप सरकारमधून बाहेर

हिमाचलमधील घडामोड: कॉंग्रेसने मुलाला उमेदवारी दिल्याचा परिणाम
सिमला – माजी केंद्रीय मंत्री सुखराम यांचे पुत्र अनिल शर्मा शुक्रवारी हिमाचल प्रदेशच्या भाजप सरकारमधून बाहेर पडले. शर्मा यांचे पुत्र आश्रय यांना कॉंग्रेसने त्या राज्यातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा दबाव शर्मा यांच्यावर होता.

काही दिवसांपूर्वी सुखराम यांनी भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यांच्या समवेत आश्रयही कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यापाठोपाठ कॉंग्रेसने आश्रय यांना लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवण्याची खेळी केली. त्यामुळे हिमाचल सरकारमध्ये ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनिल शर्मा यांची गोची झाली. तर भाजपमध्ये अस्वस्थता पसरली. शर्मा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत दबाव वाढला होता. त्यांनी पुत्राचा आणि भाजप उमेदवाराचाही प्रचार करण्यास नकार दिला होता. त्यापार्श्‍वभूमीवर, गुरूवारी हिमाचलचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते जयराम ठाकूर यांची मंडीमध्ये सभा झाली. त्यात त्यांनी आमच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री (शर्मा) कुठेतरी हरवले आहेत. त्यांचा ठावठिकाणा कुणाला माहीत असेल तर तो सांगावा, अशी उपहासात्मक टिप्पणी केली. त्या टिप्पणीमुळे दुखावलेल्या शर्मा यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचा माझ्यावर विश्‍वास न राहिल्याने ते पाऊल उचलल्याचे शर्मा यांनी म्हटले. यापुढेही भाजपमध्येच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.