विविधा : जालियनवाला बाग घटनेची शताब्दी

-माधव विद्वांस

आज जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. बंगालची फाळणी झाल्यापासून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लोकांच्या मनात असंतोष वाढतच होता. त्यातच, रौलेट कायदा 10 मार्च 1919 रोजी ब्रिटिश सरकारने अंमलात आणला होता. “सिडने ऑर्थर टेलर रौलेट’ या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने हा कायदा प्रस्तावित केला व तो ब्रिटिश सरकारने मंजूर करून त्वरित लागूही केला.

या कायद्यामुळे प्रेसवर कठोर नियंत्रण, वॉरंटशिवाय अटक, अनियंत्रित निलंबन आणि कॅर्री ट्रायल्समध्ये निरुपयोगी राजकीय कृत्यांसाठी ज्युरीलेस, आरोपींना आणि चाचणीत वापरल्या गेलेल्या पुराव्याबद्दल जाणून घेण्याचा अधिकार नाकारण्यात आला होता. त्या दोषींना सुटकेसाठी जामीनही नाकारण्यात आला होता आणि कोणत्याही राजकीय, शैक्षणिक किंवा धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित केले गेले होते. नुसत्या संशयावरून कोणालाही अटक होऊ लागली व कायद्याचे संरक्षण नाकारण्यात आले. त्याचवेळी सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या क्रांतिकारकांना अटक करून गुप्तपणे हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे तुरुंगात ठेवण्यात आले.

10 एप्रिल रोजी सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांच्या सुटकेसाठी मागणी करीत एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. त्या जमावावर गोळीबार झाल्यावर त्याचे प्रतिसाद लगेचच त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याऱ्या इमारतींना आगी लावण्यात आल्या. टाऊन हॉल, दोन बॅंकांच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम यांना आग लावण्यात आली.

दिवसभर हे थैमान सुरूच होते. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात 8 ते 10 स्वातंत्र्यसैनिक धारातीर्थी पडले. यानंतरचे दोन दिवस अमृतसर शांत होते; पण पंजाब मात्र धुमसतच होता. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी इमारतींना आग लावण्यात आली, 3 युरोपियन नागरिक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला. त्यामुळे 13 एप्रिल 1919 या दिवशी इंग्रजांच्या भारतातील राजवटीबद्दल लोकांच्या मनात खदखदत असलेला असंतोष बाहेर पडला.

त्यादिवशी वैशाखी असूनही जमावबंदी लागू करण्यात आली होती. वैशाखी हा पंजाबी हिंदू व शीख समाजाचा एकत्रित आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यादिवशी नाच, गाणी, भांगडा व कव्वाली असे परंपरागत कार्यक्रम लोक उत्साहाने खेळतात. जमावबंदीमुळे या कार्यक्रमास बंदी होती त्यामुळे वातावरण अधिकच तापले. मार्शल लॉ असूनही लोकांच्या झुंडी खेडेगावातून अमृतसरच्या दिशेने येऊ लागल्या.

पंजाबमधील ब्रिटिश ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथे जमावास अटकाव केला. जालियनवाला बाग या ठिकाणी जमलेल्या लोकांवर जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निःशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या 1,600 फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरुषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे 379 लोकांचा मृत्यू झाला.

अनधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा 1000 हून अधिक आहे. याचवेळी 1200 लोक जखमी झाले. भारतभर या हत्याकांडाच्या निषेधार्थ नोबेल पारितोषिक विजेते गुरू रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली “सर’ ही पदवी परत केली. यानंतर हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतिकारक जन्माला आले. शहीद उधमसिंग यांनी 21 वर्षांनंतर 13 मार्च 1940 रोजी या हत्याकांडाचा सूत्रधार मायकल ओडवायर याचा लंडन येथे वध केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.