जळगाव – राष्ट्रवादी पाठोपाठ आता कॉंग्रेसचे आमदारही फुटणार असल्याचा खळबळजनक दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ते कुणाकडे येतील ते सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
कॉंग्रेसचेही आमदार तयारीत आहेत, कोणाकडे ते माहित नाही परंतू, ते येतील हे मी निश्चितपणाने ऐकले आहे, असा दावा पाटील यांनी केला. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का? यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, याबाबत कुणालाच कल्पना नव्हती.
मात्र, गेल्यावेळी मी नगर येथील सभेत सांगितले होत की, विखे पाटील आणि त्यांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढेल. त्याप्रमाणे ते भाजपकडून निवडणूक लढले. त्यांनतर मी दोन महिन्यापासून सांगत होतो की, अजित पवार आपल्याकडे येतील ते आले, असे पाटील म्हणाले. आता कॉंग्रेसवाले येतील ते पण बघा, असा दावाही मंत्री पाटील यांनी केला.
दाल में कुछ काला है
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, आम्ही केलेल्या उठावासंदर्भात लोकांनी वेगवेगळे अर्थ काढले. आता नीलम ताई यांनी पक्षात प्रवेश करण्याची गरज नव्हती. मात्र, काही ना काही गडबड है, दाल में कुछ काला है, त्याच्यामुळेच लोक पक्षांतर करत आहेत. ठाकरे गटाचे आणखी कुणी शिंदे गटात येतील का? यावर बोलताना ते म्हणाले की, सध्या आपण पाहतोय की काय चाललंय ते. ज्या गोष्टी लोकांच्या डोक्यात नाहीत, त्या होत आहेत. त्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही की उद्या काय होईल, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.