लंडन – इक्वेडोरच्या दूतावासातून अटक केलेल्या ज्युलियन असांजला आता अमेरिकेच्या स्वाधीन करण्यासाठी दीर्घ मुदतीची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. आज सकाळी असांजला लंडनमधील तुरुंगातून कोर्टात नेण्यात आले. ब्रिटीश जामिनाच्या 2012 च्या अटींचा भंग केल्याबदल त्याच्यावरच्या खटल्याची सुनावणी पहिल्यांदा केली जाईल. त्यानंतर अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
काल इक्वेडोर सरकारने असांजला आश्रय नाकारल्यानंतर ब्रिटीश पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनीही असांजला ताब्यात घेण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. विकीलीक्ससाठी कॉम्प्युटर हॅकिंग केल्याचे आरोप असलेले दस्तऐवज लंडनमधील कोर्टात सादर करण्यात येणार आहेत.
असांजला दक्षिण लंडनमधील वॅन्डस्वोर्थ तुरुंगात ठेवण्यात आले असून या तुरुंगात कैद्यांची गर्दी असल्याने असांजसाठी काही खास सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. याच तुरुंगात त्याला 2010 साली स्वीडनमधील लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 9 दिवस ठेवण्यात आले होते.
जामिनासाठीच्या अटींचा भंग केल्याबद्दल असांजला वर्षभराची शिक्षा होऊ शकते. या सुनावणीनंतर 2 मे नंतर वेस्टमिन्स्टर तुरुंगातूनच प्रत्यार्पणाची व्हिडीओ लिंकच्या माध्यमातील प्रक्रिया सुरू होईल. असांजविरोधात अमेरिकेकडून आणही खोटे आरोप लावले जातील, अशी भीती विकीलीक्सचे संपादक क्रिस्टिन ह्राफ्नसन यांनी व्यक्त केली आहे.