नवी दिल्ली – महाठक सुकेश चंद्रशेखर याने जामीन मिळण्यासाठी स्वत:लाच न्यायाधीश म्हणून सादर केले होते. तसेच केंद्रातील बड्या अधिकाऱ्यांचे नाव घेऊन तो तुरूंगातूनच त्याचे वसुलीचे रॅकेट चालवत होता. त्याचा हा कारभार बिनबोभाट सुरू राहावा यासाठी तो तुरूंग अधिकाऱ्यांना दरमहा दीड कोटी रूपये लाच देत होता अशी माहिती दिल्ली पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय रस्तोगी आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठासमोर सुकेश प्रकरणाची सुनावणी सुरू असून रोहिणी तुरूंगातील अधिकाऱ्यांना दीड कोटी प्रत्येक महिन्याला दिले जात होते असे पोलीस उपायुक्त अनीश रॉय यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. आपला खंडणीचा कारभार राजरोस सुरू राहावा यासाठी हे पैसे दिले जात होते आणि कोणत्या अधिकाऱ्याला त्याने किती पैसे दिले याचा तपशीलही रॉय यांनी न्यायालयात सादर केला.
एवढेच नाही तर सुकेशने तत्कालीन न्यायाधीश कुरियन जोसेफ यांचा सचिव आणि कायदा सचिव म्हणूनही स्वत:ला सादर केले. त्याने स्वत:च त्याच्या प्रकरणाची सुनावणी ज्या न्यायाधीशांसमोर सुरू होती त्यांना कुरियन जोसेफ असल्याचे भासवून फोन केला आणि आरोपीला तातडीने जामीन मंजूर करावा असे निर्देश दिले.
तुरूंगातील अनेक सुविधा तो लाच देत मिळवत होता असे त्यांनी सांगितले आणि दिल्लीबाहेरील तुरूंगात आपल्या हलविण्यात यावे या त्याच्या मागणीला विरोध केला. सुकेश चंद्रशेखर एक अट्टल गुन्हेगार असून त्याला कायद्याचे अजिबात भय नाही. उलट आपली टोळी वाढवण्यासाठी तो कायद्याचाच उपयोग करत असून केंद्र सरकार दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप करत असल्याचे रॉय यांनी नमूद केले आहे.