वॉशिंग्टन – तीन वर्ष संपूर्ण जगाला सतावून सोडणाऱ्या करोनाच्या साथीने विविध अनुषंगिक परिणाम आता समोर येत आहेत एका नुकत्याच झाल्या संशोधनाप्रमाणे अल्पवयीन मुलांना म्हणजेच “टिन एजर्स’ना या करोना साथीचा सर्वात जास्त फटका बसला असून त्यांचा मेंदू जास्त म्हातारा झाला आहे. फक्त दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये या टीन एजर्सच्या मेंदूचे वय तब्बल तीन वर्षाने वाढले आहे.
साथीच्या कालावधीमधील लॉकडाऊन आणि इतर अनुषंगिक समस्यांचा थेट परिणाम तीन एजर्सच्या मनावर झाला आहे. “ग्लोबल ओपन सायन्स जर्नल’ या आघाडीच्या नियतकालिकामध्ये “बायोलॉजीकल सायकीयाट्री’ या शीर्षकाखाली हा लेख प्रसिद्ध करण्यात आला असून मुलांचे मेंदूचे वय जास्त प्रमाणात वाढल्याने त्यांच्या मनात नकारात्मक विचार वाढत चालले असून अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ लागले आहेत, असे या लेखामध्ये म्हटले आहे. या संशोधनामध्ये 128 मुलांचा सहभाग होता. गेल्या आठ वर्षांच्या कालावधीपासून हे संशोधन सुरू होते. ज्यामध्ये मुलांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात येत असे.
या संशोधनाचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वीच करोनाची साथ सुरू झाल्यामुळे हे संशोधन थांबले होते. पण आता पुन्हा एकदा या मुलांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले. तेव्हा ही धक्कादायक बाब उघडकीस आली. संशोधकांनी लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे एखाद्या लहान मुलाला लहानपणी जर एखादा मोठा धक्का बसला किंवा त्याच्या मनाविरुद्ध एखादी मोठी गोष्ट घडली तर त्याचा त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशाच प्रकारचा परिणाम करोना साथीच्या कालावधीमध्ये या लहान मुलांच्या मनावर झाली आहे. त्यामुळे मुलांच्या मनात नैराश्य वाढत चालले आहे.