सातारा – येथील शुक्रवार पेठेत एका वृद्ध दाम्पत्याने घरात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान उघडकीस आली. या प्रकारामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. उत्तमराव भाऊसाहेब शिंदे (वय 86) व प्रभावती उत्तमराव शिंदे (वय 75) असे या आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. यामागे नक्की कारण काय आहे, याचा शाहूपुरी पोलीस कसून शोध घेत आहेत.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तमराव शिंदे यांचे पोवई नाक्यावर छोटेसे दुकान आहे. या दुकानात ते नेहमी जात असत. मात्र, गेल्या चार- पाच दिवसांत ते दुकानाकडे फिरकलेच नव्हते. दरम्यान, बुधवारी दुपारी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी या प्रकरणाची कल्पना शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक बशीर मुल्ला तातडीने कर्मचाऱ्यांसह शुक्रवार पेठेतील आत्मगंगा अपार्टमेंटमध्ये पोहोचले. खिडकीतून हात घालून मोठ्या प्रयत्नाने पोलिसांनी दरवाजा उघडला. यावेळी उत्तमराव शिंदे आणि प्रभावती शिंदे यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यांच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाची बाटली पोलिसांना सापडली. चार दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. प्रभावती यांना वयोमानामुळे स्वयंपाक करता येत नसल्यामुळे बाहेरून दररोज जेवणाचा डबा आणत होते. त्यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याचा शोध सुरू आहे. वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी या प्रकरणावर फारशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, तपासानंतर हे तपशील उलगडले जातील असे त्यांनी सांगितले.