पिंपरी – पिंपरी विभागातील वृत्तपत्र विक्रेते संतोष वाघेरे यांची कन्या ओवी वाघेरे हिने राष्ट्रीय थायबॉक्सिंग निवड स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावित शहराच्या नावलौकिकात अधिक भर घातली आहे. तीच्या यशाबद्दल पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ आणि पिंपरी-चिंचवड शहर विक्रेता संघाकडून ओवीचे अभिनंदन करण्यात येत आहे.
भुवनेश्वर, ओरिसा येथे राष्ट्रीय थायबॉक्सिंग निवड स्पर्धा पार पडल्या. देशभरातून स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अनुसयाबाई वाघेरे इंग्लिश प्रशालेची विद्यार्थिनी ओवीने अल्टिमेट मार्शल आर्ट या क्रीडा संस्थेकडून सात वर्षे वयोगटाखालील स्पर्धेत भाग घेतला. आपल्या उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर ओवीने सुवर्ण पदक पटकाविले. या पदकासह तीची ऑक्टोबरमध्ये श्रीलंका येथे होणाऱ्या एशियन थायबॉक्सिंग स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
अनुसयाबाई वाघेरे इंग्लिश प्रशालेचे प्रमूख संदीप वाघेरे, सचिव नवनाथ नढे यांनी ओवीच्या यशाबद्दल सन्मान केला. वरिष्ठ प्रशिक्षक अमित शर्मा, आकाश ओतारी यांनी तिला मार्गदर्शन केले.