ब्रह्मोस भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले क्षेपणास्त्र
नवी दिल्ली : ओदिशाच्या चांदीपूर तळावर मंगळवारी सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण दलातील सूत्रांनी याविषयीची माहिती दिली. चांदीपूरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या कॉम्पलेक्स 3 मध्ये मोबाइल लॉंचरवरुन जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करणाऱ्या ब्रह्मोसच्या आवृत्तीची चाचणी घेण्यात आली आहे. या चाचणीने सर्व निकष पूर्ण केले आहेत असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) सांगण्यात आले. ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने मिळून विकसित केलेले सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे. युद्धनौका, पाणबुडी, मोबाइल लॉंचर आणि फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते.
ब्रह्मोस हे आजच्या घडीला भारताकडे असलेले सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. मागच्या काही काळापासून भारत हे क्षेपणास्त्र अन्य देशांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच फिलीपाईन्स ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकत घेणारा पहिला देश बनू शकतो. सध्या भारत आणि फिलीपाईन्समध्ये ब्रह्मोसची विक्री किंमत निश्चित करण्यावरुन चर्चा सुरु आहे. 2020 पर्यंत हा करार प्रत्यक्षात आणण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे.
ब्रह्मोस हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे. भारताची मागच्या काही वर्षांपासून थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम या देशांबरोबर ब्रह्मोस विक्रीबद्दल चर्चा सुरु आहे. ब्रह्मोस हे सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल असून ते जमीन आणि पाण्यातून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.
वेगवेगळ्या चाचण्यांनंतर फिलीपाईन्सच्या लष्कराने ब्रह्मोस विकत घेण्याचे सुनिश्चित केले आहे. आता फक्त किंमतीवरुन चर्चा सुरु आहे. या संरक्षण व्यवहारासाठी भारताने फिलीपाईन्सला 10 कोटी डॉलर्सचे कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे. पण फिलीपाईन्स स्वत:च्या पैशाने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा विचार करत आहे. त्यासाठी पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ब्रह्मोसच्या खरेदीसाठी तरतूद करण्याचा फिलीपाईन्सचा विचार आहे. भारतीय लष्कर आणि नौदलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा वापर सुरु केला आहे.