संख्या रोडावली : अधिकृत आकडाही उपलब्ध नाही
3 लाख मागील 18 वर्षांत खवले मांजरांची तस्करी
पुणे – तस्करी, शिकार अशा विविध कारणांमुळे भारतातील खवले मांजरांची संख्या घटत आहे. जागतिक संस्थेच्या नोंदीनुसार 2000 ते 2018 या 18 वर्षांत भारतातून तब्बल 3 लाख खवले मांजरांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तस्करी झाली आहे. त्यामुळेच “इंडियन पेंगोलिन’ म्हणजेच भारतीय खवले मांजराच्या संख्येत घट होत आहे.
जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनविषयक कार्य करणाऱ्या “इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसीएन) या संस्थेतर्फे नुकतेच जगातील धोकादायक प्रजातींची यादी जाहीर करण्यात आली. यानुसार भारतात सर्वाधिक धोकादायक प्रजातीतील प्राण्यांमध्ये खवले मांजर या समावेश आहे. गेल्या 10 वर्षांत या प्राण्याच्या संख्येत मोठी घट झाली असून, वन्यप्राण्यांची तस्करी आणि शिकार हे यामागील मुख्य कारण असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, भारतासह पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांत आढळणाऱ्या भारतीय खवले मांजराचे प्रमाणातदेखील लक्षणीय घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार, “गेल्या 18 वर्षांत तब्बल 3 लाख खवले मांजरांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तस्करी झाली आहे. सजावट, वस्त्रनिर्मितीमध्ये कातड्याचा वापर, औषधनिर्मितीमध्ये केला जाणारा वापर यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खवले मांजराला मोठी मागणी असल्याने भारत, पाकिस्तान, श्रीलंका या देशांमधून खवले मांजराची तस्करी होत आहे.’
संशोधन आणि अभ्यासाची गरज
“आययूसीएन’च्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या खवले मांजरांच्या संख्येबाबत नोंदी उपलब्ध नाहीत. त्यामुळे नेमकी किती घट झालीये, याचा अचूक आकडा सांगणे शक्य होत नाही. मात्र, या प्राण्यांच्या तस्करीचे प्रमाण पाहता प्राण्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. खवले मांजराबाबत योग्य संशोधन आणि अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यामुळेच या प्राण्याच्या संख्येबाबत आणि संवर्धनाबाबत नोंदी ठेवणे शक्य होणार असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
…म्हणून समोर येत नाही आकडेवारी
खवले मांजरांच्या खवल्यांच्या पावडरीचा वापर औषधासाठी केला जातो त्यामुळे या खवल्यांना प्रचंड मागणी असल्याचे तज्ज्ञ सांगतात. चीनमध्ये याचा वापर सर्वाधिक केला जात असल्याचे समजते. एका खवले मांजराच्या खवल्यांना लाखो रुपये मिळत असल्याचे सांगतात. हा सर्वच व्यापार बेकायदेशीर असल्याने त्याची खरी आकडेवारी कळत नाही.