नगर -केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतील यशवंत विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती आहेत. त्यातही नगरसारख्या शहरातील विनायक नरवडे यांचे यश विशेष उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नगरच्या विनायक नरवडे यांचे विशेष अभिनंदन केले.
प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने विनायक नरवडे यांचा आज विशेष सत्कार करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद करत नरवडे यांचे कौतुक केले. पक्षाचे सरचिटणीस विनायकराव देशमुख यांनी नरवडे यांच्या नगरमधील निवासस्थानी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.
माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार, ओबीसी व्हिजेएनटी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, दैनिक प्रभातचे निवासी संपादक विठ्ठल लांडगे, प्रदेश सदस्य श्याम वागस्कर, प्रा. दशरथ खोसे, जे. जे. म्हस्के, युवक कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन देशमुख, मुकुल देशमुख, ज्ञानेश्वर आव्हाड आदी यावेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष पटोलेंसारख्या नेत्याने व्हिडीओ कॉंलद्वारे विनायक नरवडे व नरवडे कुटूंबियांशी दिलखुलास व मनमोकळेपणाने संवाद साधल्याबद्दल परिवाराने आनंद व्यक्त केला.
दरम्यान, यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक निखिल वारे व बाळासाहेब पवार यांच्याशीही व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद केला. नगरमधील कॉंग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीबाबत त्यांनी दोघांकडे विचारणा केली. तसेच लवकरच प्रत्यक्ष भेटू, असेही ते म्हणाले.